बसस्थानक परिसरात प्रवाशांचे सोने चोरी करणाऱ्या महिलेकडून 17 ग्रॅम सोने हस्तगत कोतवाली पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील बसस्थानकावर चोरी करणा-या महिलेच्या ताब्यातुन चोरीच्या गुन्ह्यातील 17 ग्रॅम सोने केले हस्तगत करण्यात कोतवाली पोलीसांना मोठे यश आले आहे.

बातमीची हकीकत अशिकी, फिर्यादी नामे राजश्री शिवाजी भोंडवे (रा.जामखेड,जिल्हा अहिल्यानगर) या त्यांचे नातेवाईक यांचेसह नगर शहरातील पुणे बसस्थानक येथे जामखेड जाणा-या गाडीतुन जामखेडला जाण्याकरिता थांबलेल्या होत्या.त्यावेळी पुणे जामखेड मार्गे भुम ही एस.टी. बस लागल्याने फिर्यादी ह्या बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांचे गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरुन नेले होते.याबाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 528/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दि. 05/06/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.विक्रम वाघमारे यांचेकडे देण्यात येवून गुन्हे शोध पथकांचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेवुन गेला माल हस्तगत करणेबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आदेशीत केले होते.दि. 10 जून 2025 रोजी दुपारी माळीवाडा बसस्थानक परिसरात एक महिला ही संशयीत रित्या चोरी करण्याचे उद्देशाने फिरत असलेबाबत पोलीस निरीक्षक दराडे यांना गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहीती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना बसस्थानक परिसरात रवाना केले.माळीवाडा बसस्थानक परिसरात एक महिला ही तिचेकडील लहाण बाळासह संशयीत रित्या चोरी करण्याचे उद्देशाने फिरत असल्याचे दिसुन आल्याने महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदर महिलेकडे चौकशी केली.गोपणीय बातमीदार यांचेकडुन मिळालेली माहीती तसेच सदर महिलेच्या संशयास्पद हालचाली यावरुन तिचेकडे बसस्थानक परिसरात होणा-या चोरीच्या गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला.सदर महिला वारंवार पुणे बसस्थानक तसेच माळीवाडा बसस्थानक परिसरात फिरत असल्याचे समजले.सदर महिलेकडे अधिक चौकशी केली असता तिने दि. 05 जून 2025 रोजी पुणे बस स्थानकात सायंकाळी 06.00 वा.चे सुमारास बसमध्ये चढणा-या प्रवाशांचे गर्दीचा फायदा घेवून एका महिलेल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी केल्याची माहीती दिली. सदर चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक चौकशी केली असता तिने सदर चोरी केलेले मंगळसुत्र हे त्याची सोन्याचे धातुची लगड करुन तिची मैत्रीन रेखा मिलींद भोसले,रा.बोल्हेगाव, अहिल्यानगर हीचेकडे ठेवण्यास दिले असल्याचे सांगितले.
साक्षीदार रेखा मिलींद भोसले, रा.बोल्हेगाव,अहिल्यानगर यांना चोरीच्या गुन्ह्याबाबत माहीती देवुन त्यांचेकडे ठेवण्यास दिलेली सोन्याची लगड हजर करणेबाबत सांगितले असता त्यांनी पंचासमक्ष तपास अधिकारी यांचेकडे 17 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हजर केलेवरुन ती जप्त करण्यात आली आहे. सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असुन 100% चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर चोरी करणारी महिला ही अल्पवयीन असल्याने तिला बालकल्याण समिती,अहिल्यानगर यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,स.पो.नि. योगिता कोकाटे,पो.उप.निरी. गणेश देशमुख,पो.उप.निरी. कृष्णकुमार सेदवाड,पो.हे.कॉ. विशाल दळवी,सुर्यकांत डाके, विक्रम वाघमारे,दशरथ थोरात, संदिप पितळे,म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले,पो.कॉ.सत्यजित शिंदे,सोमनाथ केकान,महेश पवार,रोहित ठोंबे,अमोल गाडे, अतुल काजळे,म.पो.कॉ.प्रतिभा नागरे,दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.