Crime..जिल्ह्यात केमिकलपासून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..! स्थानिक गुन्हे शाखेने टाकली धाड..ते तिघे जेरबंद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध निर्मिती रॅकेटचा मोठा भंडाफोड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे केमिकलपासून दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळणाऱ्या दूध संकलन केंद्रावर धाड टाकत तब्बल १७ लाख ३२ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले.या पथकात पोउपनि समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर तसेच चालक अरुण मोरे व उमाकांत गावडे यांचा समावेश होता.
गुप्त माहितीवरून छापा
दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत माहिती संकलन सुरू असताना रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद, ता. जामखेड) हा आपल्या दूध संकलन केंद्रात केमिकलपासून दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळत असल्याची खात्रीशीर माहिती पो.नि. किरणकुमार कबाडी यांना मिळाली.त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग, अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांना सोबत घेऊन संबंधित केंद्रावर संयुक्त छापा टाकण्यात आला.छाप्यात उघड झाले धक्कादायक वास्तव
छाप्यावेळी खालील आरोपी आढळून आले:
समीर कमरुद्दीन शेख (वय ३०, रा. उंबरे, ता. राहुरी)
आफताब कलीम शेख (वय २८, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी)
रामदास नवनाथ उबाळे (वय ४६, रा. फक्राबाद, ता. जामखेड)
दूध संकलन केंद्राची पाहणी करताना ६ ड्रममध्ये एकूण ११९८ लिटर ‘Paraffin Oil’ हे केमिकल, ३०० किलो पांढऱ्या रंगाची पावडर तसेच ३२० लिटर तयार केलेले बनावट दूध आढळले.चौकशीत आरोपींनी कबूल केले की या ६ ड्रममधील केमिकलपासून सुमारे २४ हजार लिटर दूध तयार करता येते. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांनी तपासणीदरम्यान हे केमिकलपासून तयार होणारे दूध मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट केले.
जप्त मुद्देमाल
११९८ लिटर Paraffin Oil – किंमत ₹२,३९,६००
३०० किलो पांढरी पावडर – किंमत ₹८१,०५६
३२० लिटर बनावट दूध – किंमत ₹१२,१६०
दोन पिकअप वाहने – किंमत ₹१४,००,०००
एकूण जप्ती: ₹१७,३२,८१६
गुन्हा दाखल
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र. नं. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(१), २६(२)(i) सह शिक्षा कलम ५७, ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
