Crime..पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना लुटणारा ‘तो’ सराईत गुन्हेगार एलसीबी च्या जाळ्यात..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करत चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने चतुराईने सापळा रचून जेरबंद केले आहे.या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.या प्रकरणातील फिर्यादी हे ९ ऑगस्ट २०२५ रोजी सावेडी परिसरातील जॉगिंग पार्कजवळ उभे असताना,दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. मोटारसायकलवर आलेल्या एका इसमाने हेल्मेट घातले होते, तर दुसरा पायी होता.दोघांनी मिळून स्वतःला पोलीस असल्याचे सांगत एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याचा बहाणा केला.यावेळी आरोपींनी बनावट ओळखपत्र दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या खिशातील मोबाईल, सुट्टे पैसे तसेच हातातील सोन्याच्या व तांब्याच्या अंगठ्या “तपासणीसाठी” घेतल्या. नंतर त्या अंगठ्या परत देण्याच्या नावाखाली पिशवीत ठेवल्याचे सांगत आरोपी फरार झाले. या प्रकारात फिर्यादीची फसवणूक झाली होती.या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.गोपनीय माहितीच्या आधारे भिंगार येथील गोविंदपुरा नाका परिसरात सापळा रचण्यात आला.तेव्हा संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत हा प्रकार आपल्या साथीदारासह केल्याचे सांगितले. त्याचा साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून,अटक करण्यात आलेला आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.याशिवाय संगमनेर येथेही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे उघड झाले असून,त्या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात असल्याची खात्री करण्यात आली आहे.सध्या अटक आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार राहुल द्वारके,फुरकान शेख,भिमराज खर्से,रिचर्ड गायकवाड,राहुल डोके,सुनिल मालणकर,भगवान थोरात,सतिष भवर,चालक उत्तरेश्वर मोराळे यांनी केली आहे.
