बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य..मटका-दारू-जुगार खुलेआम सुरू..नागरिकांमध्ये तीव्र संताप
श्रीगोंदा (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची गंभीर चर्चा परिसरात रंगू लागली आहे.बेलवंडी बुद्रुक-कोठार,आढळगाव, कोळगाव,अजनूज,पिंपळगाव पिसा,पारगाव सुद्रिक,घोगरगाव, बनपिंप्री,भापकरवाडी,भावडी, आनंदवाडी,बाबुर्डी,बांगर्डे, भिंगण,चिलवडी,ढवळपुरी, लिंपणगाव,निमगाव खलू, पेडगाव,पिंपरी कोलंदार, पोहेवाडी,वाडगाव आणि वांगदरी अशा अनेक लहान-मोठ्या गावांचा समावेश या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात होतो.मात्र या विस्तीर्ण हद्दीत मटका, हातभट्टी दारू आणि जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात फोफावल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.माहितीनुसार,काही महिन्यांपूर्वीच बेलवंडी पोलीस ठाण्यात नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे.परंतु त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर अपेक्षित ती ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. उलट काही वादग्रस्त अंमलदारांना जवळ ठेवून अवैध धंदे चालवणाऱ्यांकडून ‘मलिदा’ गोळा करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.स्थानिकांच्या मते,या अंमलदारांची गुन्हेगारांशी असलेली जवळीक दिवसेंदिवस वाढत चालली आहे.गुन्ह्यांचा छडा लावण्याऐवजी काही पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध धंदे करणाऱ्यांशी सलगी वाढल्याचे चित्र दिसून येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये याबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये मटका अड्डे,हातभट्टी दारूचे अड्डे आणि जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे.काही ठिकाणी तर रात्री उशिरापर्यंत हे अवैध व्यवहार सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांमुळे परिसरातील युवकांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान,बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना त्यावर आळा घालण्यासाठी ठोस कारवाई का होत नाही,असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. “या अवैध धंद्यांना आता रोखणार कोण?” असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्हा पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी व्हावी,अशी मागणीही पुढे येत आहे.सध्या तरी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
