चिंचोली ग्रामसभेत युवकाचा जोरदार थरार..! पाण्याच्या टाकीसह शालेय घोटाळ्यांचे पितळ उघडे;बड्या कार्यकर्त्यांची बोलती बंद करत दिला थेट १ महिन्याचा अल्टीमेटम!
संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):- ग्रामसभा म्हणजे गावाच्या विकासाचे आणि लोकशाहीचे मुख्य व्यासपीठ! मात्र,याच ग्रामसभेत जेव्हा सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न मांडायला स्थानिक नेते व कार्यकर्ते कचरतात,तिथे एका धडाडीच्या तरुणाने मात्र अन्यायाविरोधात आवाज उठवत संपूर्ण ग्रामसभा गाजवून सोडली आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील ग्रामसभेत सागर गोडगे या ध्येयवादी युवकाने गावपातळीवरील अनेक प्रलंबित समस्यांवर,राजकीय निष्क्रियतेवर आणि भ्रष्टाचार-अनियमिततेवर थेट ताशेरे ओढत उपस्थितांना निरुत्तर केले.या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युवकाच्या या बिनधास्त व धाडसी भूमिकेचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.
📌 ग्रामसभेत उठवलेले प्रमुख मुद्दे व सवाल:
१. राजकीय निष्ठा आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरील प्रकारावरून निषेध: गावातील सोशल मीडिया (WhatsApp) ग्रुप्सवर जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात होणाऱ्या अवमानकारक पोस्ट आणि व्यंगचित्रांवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या शांततेवर सागर गोडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.ज्या नेत्यांच्या छत्राखाली पदे भोगली,त्यांनीच मिठाला जागून अशा प्रवृत्तींचा विरोध करायला हवा होता,अशी खरमरीत टीका करत निष्क्रीय सदस्यांचा जाहीर निषेध नोंदवला.
२.रयत शिक्षण संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न आणि १ महिन्याचा अल्टीमेटम: गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत कोट्यवधींचा निधी येऊनही विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह/मुतारी (Toilet) सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध का नाहीत,असा थेट सवाल केला.शाळेतील शिक्षकांची कमतरता, इंजिनिअरचे रखडलेले पैसे, अपूर्ण कंपाउंड आणि शालेय कमिटीतील राजकीय हस्तक्षेप यावर बोट ठेवले.इशारा:येत्या १ महिन्यात शाळेच्या जमा-खर्चाचा हिशोब न मिळाल्यास आणि समस्या न सुटल्यास ११ सप्टेंबर रोजी शाळेसमोर उपोषण करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
३.पिण्याच्या पाण्याची टाकी असूनही थेंबभर पाण्यासाठी टंचाई:सन २०१९-२० मध्ये लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी व पाईपलाईन झाली, ग्रामस्थांकडून कनेक्शनचे पैसेही घेतले गेले;परंतु आजतागायत त्या टाकीतून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी का मिळाले नाही? असा प्रशासनाला जाब विचारला.
४.रस्ते आणि अतिक्रमणाचा प्रश्न: जेजुरी-गुराव-भागोडी रस्ता आणि जुन्या मळ्यातील रस्ता,चिंचोली गुरव ते भगतवाडी रोड अतिक्रमणामुळे व दुरावस्थेमुळे रखडला आहे.ग्रामपंचायतीने तातडीने अतिक्रमण हटवून रस्ते सुरळीत करावेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
५.पोल्ट्री व्यवसाय आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव: गावात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या मेलेल्या कोंबड्यांमुळे दुर्गंधी पसरत असून त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.यामुळे शेतीचे नुकसान व लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.निष्काळजी पोल्ट्रीधारकांवर कठोर कारवाईची मागणी केली.
🎙️सरपंच व प्रशासनाचा खुलासा:ग्रामसभेत उपस्थित सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी तरुणाने मांडलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.शाळेचा हिशोब व सुविधा:शाळेच्या स्वच्छतागृहासाठी १० लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच काम पूर्ण होईल आणि हिशोबही ग्रामस्थांसमोर मांडला जाईल,असे आश्वासन दिले.रस्ते व पोल्ट्री प्रश्न: रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या पोल्ट्रीधारकांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
💬 गावात कौतुकाचा वर्षाव: नेत्यांच्या मागे पुढे न करता, कोणाच्याही दबावाला न बळी पडता थेट ग्रामसभेत पत्रकारांसमोर गावाच्या ज्वलंत समस्या मांडणाऱ्या या युवकाचे धाडस पाहून संपूर्ण गावातून व सोशल मीडियावरून सागर गोडगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.ग्रामसभा अशीच पारदर्शक आणि जिवंत असावी!”अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
