मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नातेवाईकांमधील किरकोळ भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणावर लोखंडी कत्तीने सपासप वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. हरीष गुलाब काळे (वय ३०, रा.पिंपळगाव कौडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,अहिल्यानगर गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्याला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले.दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास पिंपळगाव कौडा येथे हरीष काळे याच्या घरात जोरदार भांडण सुरू होते.हे भांडण मिटवण्यासाठी विक्रम भोसले आणि त्यांचा भाऊ किरण भोसले (दोघे रा.पिंपळगाव कौडा) मध्यस्थी करण्यासाठी गेले.मात्र,वाद सोडवण्याचा राग मनात धरून हरीष काळे याने थेट लोखंडी कत्ती काढून किरण भोसले यांच्या तोंडावर, छातीवर आणि पोटावर सलग प्राणघातक वार केले.या भीषण हल्ल्यात किरण भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा (BNS कलम १०३(१), ३५२, ३५१(२)) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने विशेष पथक तयार केले.गुन्हा केल्यानंतर आरोपी सातत्याने आपले पत्ते बदलत होता. श्रीगोंदा,दौंड,पुणे आणि मुंबई अशा विविध शहरांत तो पोलिसांना चकवा देत फिरत होता.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपी कल्याण रेल्वेस्टेशन परिसरात दबा धरून बसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपी हरीष काळे याच्या मुसक्या आवळल्या.आरोपीला पुढील कारवाईसाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार फुरकान शेख,शामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,रोहित मिसाळ,प्रताप देवकाते,दिपक जाधव आणि अरूण मोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
