स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-घराच्या खोदकामात सापडलेले एक किलो सोने स्वस्तात विकण्याचा बहाणा करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १,६०० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त केले आहेत.नवनागापूर येथील सचिन बाळासाहेब वाघ (वय ३०) यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी १ लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते.उर्वरित व्यवहारासाठी फिर्यादीला जुने आरटीओ ऑफिस परिसरात बोलावले असता,संशय आल्याने फिर्यादीने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिघांना रंगेहात ताब्यात घेतले.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल शंभू सोलंकी (वय २४,रा. रामटेक,नागपूर),नंदू मानसिंग सोलंकी (वय ३६,रा.रामटेक, नागपूर),पूजा राहुल सोलंकी (वय २४,रा.रामटेक,नागपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून १,६०० ग्रॅम बनावट सोन्याची मण्यांची माळ,५२ हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल व हँडबॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,संदीप पवार,शाहीद शेख,विशाल गवांदे,संतोष खैरे,रोहित मिसाळ,प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
