अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तोफखाना परिसरातील ऐतिहासिक ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर बाल मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात परंपरेला आधुनिकतेची जोड देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ हा नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण देखावा सध्या संपूर्ण अहिल्यानगर शहरात भाविक आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.या देखाव्याच्या माध्यमातून शहराचा गेल्या काही वर्षांत झालेला कायापालट आणि प्रगतीचा चढता आलेख अत्यंत कल्पकतेने मांडण्यात आला आहे.
उड्डाणपूल आणि प्रशासकीय इमारतीची सुंदर प्रतिकृती
या भव्य देखाव्यात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि नेतृत्वाखाली शहरात आकारास आलेल्या प्रमुख विकासकामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शहराची वाहतूक कोंडी फोडणारा नव्याने उभारलेला उड्डाणपूल,शहराच्या वैभवात भर घालणारी अत्याधुनिक प्रशासकीय इमारत तसेच भारतीय जनता पक्षाच्या भव्य कार्यालयाची हुबेहूब आणि देखणी प्रतिकृती या देखाव्यात उभारण्यात आली आहे. याशिवाय काँक्रीट रस्त्यांचे जाळे,नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी विकसित झालेली नवी उद्याने,सक्षम पाणीपुरवठा योजना, शिक्षण सुविधांचा विस्तार आणि एकूणच नागरी विकास अधोरेखित करणारे माहितीपूर्ण दिशादर्शक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा जागर:’ग्रीन सिटी मोहिमे’चा विशेष समावेश
केवळ काँक्रीटच्या पायाभूत सुविधाच नव्हे,तर शहराच्या पर्यावरण संवर्धनावरही या देखाव्यात विशेष भर देण्यात आला आहे.उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या पुढाकाराने शहरात वेगाने राबवली जात असलेली महत्त्वाकांक्षी ‘ना.राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम’ या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. देखाव्याच्या उजव्या बाजूला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांच्या छायाचित्रांसह शहराला हिरवेगार करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट करणारी ही मोहीम ठळकपणे अधोरेखित केली आहे.
“समृद्ध अहिल्यानगर, विकसित महाराष्ट्र”
देखाव्याच्या तळाशी दिमाखात झळकणारा “समृद्ध अहिल्यानगर,विकसित महाराष्ट्र” हा संदेश शहराच्या आणि जिल्ह्याच्या उज्वल भविष्याची दिशा स्पष्ट करतो. राजकीय इच्छाशक्ती आणि विकासात्मक व्हिजन एकत्र आल्यास शहराचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो,याचे उत्तम चित्रण या देखाव्यातून उभे राहिले आहे. हा माहितीपूर्ण आणि नेत्रदीपक देखावा पाहण्यासाठी तोफखाना परिसरात सध्या नागरिकांची आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
