शहरातील ड्रग्स माफियाचा खेळ खल्लास..! मेफेंटरमिन गुंगीच्या ५५ बाटल्या जप्त दोन आरोपी अटक
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरातील वाढत्या नशेच्या गैरप्रकारांवर लगाम घालत श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मेफेंटरमिन या गुंगीकारक औषधाच्या ५५ बाटल्या जप्त केल्या असून,या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दि.१७ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,वार्ड क्रमांक ७ मधील थत्ते ग्राउंड परिसरात दोन इसम नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमिन इंजेक्शनच्या बाटल्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत.माहिती खात्रीशीर असल्याने तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.त्यानुसार पोलिसांच्या तपास पथकाने थत्ते ग्राउंड परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयित दोघे इसम मिळून आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.त्यावेळी त्यांनी आपली नावे अथर्व पाटील (वय २२,रा. वार्ड नं.७,श्रीरामपूर),गिरीश मुंदडा (वय २१,रा.साई सहवास अपार्टमेंट,श्रीरामपूर) अशी सांगितली.
तपासा दरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमिन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या.यात TERMIVA या औषधाच्या ५ बाटल्या (प्रत्येकी 30 mg/ml, किंमत सुमारे १,५६९ रुपये) TERMIN या औषधाच्या ५० बाटल्या (प्रत्येकी 30 mg/ml, किंमत सुमारे १८,९५० रुपये) असा एकूण २०,५१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही औषधे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, १२५ व २७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे नशेच्या पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर मोठा आळा बसणार असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
