सोनोशी शाळेचा दणदणीत झेंडा..!दोन विद्यार्थ्यांची ‘जवाहर नवोदय’मध्ये दमदार एन्ट्री..विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी; शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळाले यश
(प्रतिनिधी):-जि.प.प्राथमिक शाळा,सोनोशी या शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. शाळेतील दोन होतकरू विद्यार्थ्यांनी ‘जवाहर नवोदय विद्यालय’ प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये
🌟 सत्यजित अण्णासाहेब साळुंके
🌟 सार्थक गणेश आंधळे
यांचा समावेश असून,त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री,प्रतिकूल परिस्थिती आणि स्पर्धेची तीव्रता यावर मात करत या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.या यशामागे शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन,नियोजनबद्ध तयारी आणि विद्यार्थ्यांची मेहनत हे प्रमुख घटक ठरले.या यशानिमित्त शाळेत छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देविदास बडे सर,पदवीधर शिक्षक बाबासाहेब खेडकर, अमोल भंडारी,सहशिक्षक दत्तात्रय दहिफळे व नारायण सर यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांचे कौतुक केले.तसेच,या यशाचे खरे शिल्पकार असलेले पाचवीचे वर्गशिक्षक अण्णासाहेब साळुंके सर यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, असे यावेळी नमूद करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून पुढील वाटचाल अधिक उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.सोनोशी शाळेच्या या यशामुळे केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
