जिल्ह्यात छुप्या मार्गाने फोफावलेल्या अवैध वाळू तस्करी विरोधात LCB ची धडक कारवाई..तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-जिल्ह्यात छुप्या मार्गाने फोफावलेल्या अवैध वाळू तस्करी विरोधात पोलीस प्रशासनाने आता थेट ‘आक्रमक पॅटर्न’ सुरू केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) राहाता तालुक्यात धडक कारवाई करत वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.पुणतांबा ते शिर्डी रस्त्यावरील नपावाडी चौफुल्यावर अचानक रचलेल्या सापळ्यात तब्बल ३० लाख ४० हजार रुपयांच्या मुद्देमालासह वाळू तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक ज्यात पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले,रणजीत जाधव,योगेश कर्डीले आणि दिपक जाधव यांचा समावेश होता.हे राहाता परिसरात गस्तीवर होते.त्याच वेळी गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की,नपावाडी (ता. राहाता) शिवारातून पिवळ्या रंगाचे डंपर बेकायदेशीर वाळू घेऊन शिर्डीच्या दिशेने सुसाट निघणार आहेत.माहिती मिळताच पथकाने कोणतीही हालचाल न दिसू देता नपावाडी चौफुल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ‘सर्जिकल’ सापळा रचला.रस्त्यावरून सुसाट येणाऱ्या दोन पिवळ्या रंगाच्या टाटा डंपरला पोलिसांनी हात दाखवून अचानक रोखले. वाहनांची पाहणी केली असता आतमध्ये बेकायदेशीर उपसा केलेली वाळू ठासून भरलेली आढळली.वाहनातील चालकांकडे रॉयल्टी किंवा परवान्याची मागणी केली असता त्यांनी हात वर केले.
पोलिसांनी घटनास्थळावरून MH-17-CV-7716: किंमत ₹ १५,००,०००/- (वाळू ₹ २०,०००/-)
बिना क्रमांकाचा टाटा डंपर: किंमत ₹ १५,००,०००/- (वाळू ₹ २०,०००/-) एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ३०,४०,०००/-मुद्देमाल जप्त केला.विशाल नितीन कोल्हे (वय २१, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता),दौलत एकनाथ सोनवणे (वय ४०,रा. केलवड, ता. राहाता) या दोन चालकांना ताब्यात घेतले. ही वाळू वाहतूक ते स्वतःच्या मनाने नाही,तर मालक कोते (पूर्ण नाव माहित नाही, रा. शिर्डी) आणि चौधरी (पूर्ण नाव माहित नाही,रा.नांदुर्खी,ता. राहाता) यांच्या थेट सांगण्यावरून करत असल्याचे निष्पन्न झाले.भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गु.र.नं. ३२१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धडक कामगिरी LCB च्या पथकाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली असून,आता या सिंडिकेटमधील मुख्य मालक ‘कोते’ आणि ‘चौधरी’ यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राहाता पोलीस पुढील तपास करत आहेत.
