कराड हादरले..! इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘तो’ धक्कादायक प्रकार..बेजबाबदार कुत्र्याच्या मालकावर थेट FIR दाखल!
महाराष्ट्र न्यूज 24 (कराड प्रतिनिधी):-पाळीव कुत्रा पाळताय? मग प्रेमाने सांभाळा अन् पूर्ण जबाबदारी घ्या… निष्काळजीपणा दाखवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण कराल,तर गाठ थेट कायद्याशी आहे!” असाच एक खणखणीत इशारा देणारी ऐतिहासिक घटना कराडमध्ये घडली आहे.कराड शहर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बेजबाबदार पाळीव कुत्र्याच्या मालकाविरोधात थेट एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून,या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जलविहार कॉलनी,बनवडी (कराड) येथील एका इमारतीमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून एका पाळीव कुत्र्यामुळे रहिवाशांचे जगणे असह्य झाले होते.नाव सांगायलाच फक्त कुत्र्याचे मालक,पण त्याला वेळेवर खायला-प्यायला काही द्यायचे नाही! भुकेने व्याकुळ झालेला तो प्राणी तासनतास केविलवाणा भुंकायचा.स्वतःच्या घरात घाण नको म्हणून मालक त्याला नेहमी बाहेर मोकळा सोडून द्यायचा. हा मोकळा कुत्रा लहान मुलांचा चावा घेणे,जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या मागे धावणे आणि गाड्यांना आडवे जाणे असे प्रकार करत होता.यामुळे अनेक जण खाली पडून दुखापतग्रस्त झाले,तर काहींचे भयंकर अपघातही झाले.मात्र,एवढे गंभीर प्रकार घडल्यानंतरही मालकाने कधी साधी विचारपूस करण्याचे सौजन्य दाखवले नाही किंवा उपचाराचा खर्च केला नाही.इमारतीच्या पायऱ्यांवर आणि रस्त्यावर कुत्र्याची घाण, जाण्या-येण्याच्या मार्गात अडथळा यामुळे बाहेरून येणारे कामगार,डिलिव्हरी बॉय आणि लहान मुले इमारतीत यायला थरथर कापायचे. दुसऱ्या,तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना पाहुण्यांना आणायला अन् सोडायला थेट पार्किंगपर्यंत जावे लागत होते.
विशेष म्हणजे,रहिवासी त्रास सांगायला गेले की,हा मालक, त्याची बायको आणि मुले उलट भांडणे उकरून काढायचे आणि “हा त्रास सहन करावाच लागेल” असा आव आणायचे.यापूर्वी कराड शहर पोलीस ठाण्याच्या रेखा देशपांडे, जगदाळे,सपकाळ,थोरात आणि चौधरी यांनी मालकाला समजावून सांगितले होते. परंतु,तरीही मालकाच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही.उलट “आम्ही घरात नसताना कुत्रा मोकळा राहतो,आम्ही काय करणार?” अशी बेजबाबदार उत्तरे दिली जात होती.अखेर या कुत्र्याच्या अडथळ्यामुळे इमारतीच्या पायऱ्यांवर एका नागरिकाचा पाय मुरगळून गंभीर दुखापत झाली.जेव्हा पीडित नागरिक तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले,तेव्हा या बेजबाबदार मालकाने आणि त्याच्या बायकोने थेट पोलीस ठाण्यातच “गुन्हा दाखल केला तर बघून घेऊ!” अशा धमक्या दिल्या.धमक्यांना न घाबरता नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय गोडसे यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य मांडले.गोडसे यांनी घटनेची तात्काळ गंभीर दखल घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते स्वतः रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून राहिले आणि त्यांनी गुन्हा नोंदवण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घेतली.कराड शहर पोलिसांच्या या ऐतिहासिक आणि खंबीर कारवाईमुळे नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय गोडसे आणि संपूर्ण कराड पोलीस टीमचे मनापासून आभार मानले आहेत.”कराड अन् परिसरात कुठेही असा प्रकार सुरू असेल,बेजबाबदार मालकांमुळे नागरिकांना, महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होत असेल तर सांगा भीती कसलीच नाही…कारण पाठीशी कायदा,सत्य आणि जनता आहे! असे यावेळी आदिशक्ती महासंघाच्या अश्विनीताई वेताळ पाटील म्हणाल्या.
