पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला ७ वर्षांची सक्तमजुरी..!” निर्घृण मारहाण, संशय आणि मानसिक छळाचा शेवट न्यायालयीन शिक्षेत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पत्नीला सतत मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात आरोपी मिरीमयी निहार मृधा (वय २८ वर्षे,मूळ रा.गडचिरोली, सध्या वनराई कॉलनी, नवनागापूर ता.जि. अहमदनगर) यास मा.जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार एस.कुलकर्णी यांनी भा.दं.वि. कलम ३०६ अंतर्गत ७ वर्षे सक्तमजुरी व २०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ९ महिने साधी कैद ठोठावण्यात आली आहे.तसेच इतर कलमान्वयेही शिक्षा देण्यात आली असून, कलम ४९८(अ) अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व १०० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना कैद), कलम ५०४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व १०० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना कैद) अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले.सदर घटनेची हकीकत अशी की,आरोपी मिरीमये मृधा याचे विवाह २०१४ साली गडचिरोली येथे प्रेमविवाह झाला होता.त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.आरोपी अहमदनगर येथे एमआयडीसीमध्ये नोकरी करत होता.तो पत्नीवर संशय घेत असे व “तुझे गावाकडे लफडे आहे, त्यामुळे तू माझ्याकडे येत नाहीस” असे म्हणत सतत तिचा छळ करत होता.
२०/०७/२०२३ पासून आरोपीने पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.तिला जबरदस्तीने दारू पाजत असे, जेवण देत नसे,तसेच तिचे डोके भिंतीवर आपटत असे.इतकेच नव्हे तर तिचे केस धरून मारहाण करत असे.सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे पीडित महिलेने दि.२८/०७/२०२३ रोजी राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.या घटनेनंतर मृत महिलेचा मुलगा कुणाल व आरोपीची आई प्रतीलता मिरेयमय हिस यांनी दि. २९/०७/२०२३ रोजी फिर्याद दिली.त्यानुसार आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.कलम ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.
यामध्ये वैद्यकीय अधिकारी,मृत महिलेचा मुलगा कुणाल तसेच तपासी अधिकारी पीएसआय.हंडाळ व पीएसआय दीपक पाठक यांचे साक्षपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.मा.न्यायालयाने सर्व पुरावे व साक्षी विचारात घेऊन आरोपी मिरेयमय मुधा यास भा.दं.वि. कलम ३०६, ४९८(अ), ५०४, ३२३ अंतर्गत एकूण ७ वर्षे सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात महिला पोलीस अंमलदार यशांजली जपकर व अंमलदार स्वाती गुंजाळ यांनी सहकार्य केले.या निकालामुळे कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कठोर संदेश गेला असून महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा न्यायव्यवस्थेने दिला आहे.
