निष्काळजी ट्रॅक्टर चालकाला न्यायालयाची कडक शिक्षा..! अपघातात मृत्यू..आरोपीस १ वर्ष सक्तमजुरीसह १० ह जाराचा दंड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्यामुळे झालेल्या अपघात प्रकरणी न्यायालयाने ट्रॅक्टर चालकास कठोर शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात चालकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ तुकाराम पठारे (वय ४५,रा.डोंगरगण,ता.जि. अहमदनगर) हे ट्रॅक्टर चालवत असताना त्यांनी वाहन निष्काळजीपणे व वेगात चालवून रस्त्यावरील एका व्यक्तीस धडक दिली.तसेच वाहनाचे लाईट व इंडिकेटर योग्यरित्या न वापरल्यामुळे हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन मा. न्यायाधीश के.जी.पिंगळे यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व १०,००० रुपये दंड, तसेच इतर कलमान्वये स्वतंत्र शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.
सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रमोद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी दीपक गांगर्डे यांनी केला.तसेच एलपीसी गंजाळ व एलपीसी गुंजाळ व एलपीएन ठोंबरे यांनी तपास व न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.या निकालामुळे निष्काळजी वाहनचालकांना स्पष्ट इशारा मिळाला असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
