Crime..नोकरीच्या आमिषाने 30 लाखांचा गंडा..! बनावट नियुक्तीपत्र-नोटरी कराराचा धक्कादायक पर्दाफाश.. कुठे घडली घटना वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यात नोकरीच्या आमिषाने तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,बनावट नियुक्तीपत्रे आणि नोटरीद्वारे करारनामा करून विश्वासार्हतेचे आवरण तयार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून,अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रुपेशकुमार राम बागडे (वय 39) आणि प्रियांका महादेव आदापुरे (वय 35,रा.शिक्षक कॉलनी, माळीबाभूळगाव,ता.पाथर्डी) या दांपत्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.दोघेही शिक्षक पदासाठी प्रयत्न करत असताना त्यांची ओळख सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी,ता.पाथर्डी) याच्याशी झाली.खेडकर याने स्वतः छत्रपती संभाजीनगर येथील क्रीसेंट एज्युकेशन सोसायटी या अनुदानित संस्थेत नोकरी करत असल्याचे सांगून, डी.एड.च्या दोन जागा रिक्त असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. जाधव यांनी प्रत्येकी 15 लाख रुपये घेऊन दोघांना शिक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरीच्या आशेने बागडे दांपत्याने नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत आरटीजीएस, फोनपे आणि रोख स्वरूपात एकूण 30 लाख रुपये दिले. विश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने बनावट मान्यता आदेश आणि नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.इतकेच नव्हे,तर नोटरीद्वारे करारनामा करून व्यवहार अधिक विश्वासार्ह दाखवण्यात आला. या करारनाम्यात जवरे लक्ष्मण रघुनाथ, रुपेशकुमार बागडे, सुग्रीव तुकाराम खेडकर आणि प्रियांका आदापुरे यांची सहशिक्षक म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली आहे. कार्यकाळात बदल झाल्यास जबाबदारी संस्थेची राहील, तसेच कोणत्याही प्रकारचा दगाफटका झाल्यास तब्बल 50 लाख रुपये परत करण्याची जबाबदारी लिंबराज जाधव आणि सुभाष खेडकर यांच्यावर राहील, असा उल्लेख करारनाम्यात करण्यात आला आहे.दरम्यान,प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दांपत्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातल्याची शक्यता व्यक्त होत असून, संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करून इतर बळींचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडित दांपत्याने केली असून, आता पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
