घर देतो म्हणत साडेसहा लाखांची केली फसवणूक..न्यायालयाचा आदेश ही धुडकावला..अखेर त्या ३० वर्षीय आरोपीस LCB ने जेलमध्ये धाडला
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-घर मिळवून देतो म्हणून तब्बल ६.५ लाख रुपये लाटले…कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आणि आरोपीने धूम ठोकली. मात्र,स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) चाणाक्ष नजरेतून तो सुटू शकला नाही.घर घेण्याचे स्वप्न दाखवून एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणि न्यायालयाचा जामीन फेटाळल्यानंतर फरार झालेल्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.स्वप्न घराचं,डाव फसवणुकीचा बालिकाश्रम रोड,सुडके मळा येथील रहिवासी राजेश्वर मनोहर भोसले यांना ‘घर घेऊन देतो’ असे आमिष दाखवण्यात आले होत.आरोपी संकेत राजेंद्र भोसले (वय ३०,रा. पिंपळगाव माळवी) याने फिर्यादीकडून तब्बल ₹६,५०,०००/- (साडेसहा लाख रुपये) ऑनलाइन व रोख स्वरूपात उकळले.पैसे उकळल्यानंतर आरोपीने हात वर केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तोफखाना पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५६२/२०२५) दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी (Criminal Bail App. 999/2025) अर्ज केला होता.मात्र,मा.न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज थेट नामंजूर केला.जामीन फेटाळताच आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने पोलीस अंमलदार संदीप पवार,शाहीद शेख आणि गणेश धोत्रे यांचे विशेष पथक तयार केले.आरोपी अहिल्यानगर परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.१३ ऑगस्ट रोजी पथकाने भिस्तबाग महाल, तपोवन रोड परिसरात सापळा रचून आरोपी संकेत राजेंद्र भोसले (वय ३०) याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
