शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-शहर वाहतूक शाखेने आज धडाकेबाज कारवाई करत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या शेकडो वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.एकाच दिवशी २७० वाहनांवर कारवाई करून तब्बल २ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा दंड ई-चलानद्वारे वसूल करण्यात आला.शहराच्या वर्दळीच्या भागातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशावरून ही मोहीम राबवण्यात आली.शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी पोनि.महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दाळमंडई आडते बाजार आणि डी.एस. पी.चौक परिसरात दुपारी १२:०० ते २:०० या दोन तासांच्या कालावधीत कडक नाकाबंदी लावली.या कारवाईत पोलिसांनी ‘काळ्या काचा’ असलेल्या ६० वाहनांवर, ‘विना नंबर प्लेट’ च्या ३८ वाहनांवर आणि ‘लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या’ ३८ चालकांवर केसेस केल्या. याव्यतिरिक्त, सर्वाधिक धोक्याचे मानले जाणारे ‘ट्रिपल सीट’ २१ केसेस, ‘विना सीट बेल्ट’ १८ केसेस आणि ‘विना लायसन्स’ चालवणाऱ्या ३ जणांवरही कारवाई करण्यात आली.
नवीन नियमांनुसार अनिवार्य असलेल्या ‘HSRP नंबर प्लेट’ नसल्यामुळे १५ वाहनांना दंड ठोठावण्यात आला.या कारवाईत पोसई.शमुवेल गायकवाड,पोसई अन्सार शेख,पोसई.रामराव शिरसाठ, यांच्यासह पोलीस कर्मचारी विष्णू खेडकर,बाप्पू उंडे,अजय जपकर आणि सुरज शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा मोहिमा सातत्याने सुरू राहतील, असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. तसेच सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
