एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पांढरी पूल परिसरातील हॉटेल ‘गुडलक’ येथे घडलेल्या थरारक आणि खळबळजनक सागर ऊरुडे हत्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.या प्रकरणातील आधीच्या दोन आरोपींनंतर आता गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले असून खाकीचा दणका दाखवला आहे.फिर्यादी विशाल महादेव ऊरुडे (वय २६,रा.नेप्ती नाका,दातरंगे मळा,नालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,ऋषिकेश गहिनीनाथ आव्हाड हा पांढरी पूल येथे ‘गुडलक’ नावाचे हॉटेल गणपती विसर्जनानंतर सुरू करणार होता.त्याच्या पूर्वतयारीसाठी व नंतर व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम पाहण्यासाठी विशाल यांचा भाऊ सागर महादेव ऊरुडे (वय २८) याला सोबत नेण्यात आले होते.मात्र,तिथे कसलेही ठोस कारण नसताना आरोपी सागर आव्हाड व शेखर खंडागळे यांनी सागर ऊरुडे याला जबर व गंभीर मारहाण केली.या अमानुष मारहाणीत सागर ऊरुडे याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१),३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान,सुरू असलेल्या सखोल तपासात या खुनामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवत विठ्ठल गंगाराम काळे (रा. खोसपुरी,ता.जि. अहिल्यानगर) याला तात्काळ ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करत आहेत.सदरची धडक कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात,पोसई.अमोल गर्जे यांच्यासह पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,शैलेश रोहोकले,देविदास खेडकर,राजु सुद्रीक,दिपक फुंदे, नवनाथ दहिफळे,किशोर जाधव,संपत खेडकर,प्रशांत धुमाळ,राहुल गुंडू आणि अरुण सांगळे यांनी केली आहे.
