नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने व पुरुषांच्या सोन्याच्या चैनी लंपास करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.नालेगाव येथे नागपंचमीनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या पूनम गडाख यांचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लंपास केले होते.याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. कृष्णकुमार सेदवाड,अंमलदार अतुल लोटके,विजय ठोंबरे, रणजीत जाधव,अमृत आढाव आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने तिसगाव येथे सापळा रचून पांडुरंग सोन्याबापू मासाळकर (वय ४६, रा. विजयनगर,पाथर्डी),राजेंद्र दामू माने (वय ३७,रा. नाथनगर,पाथर्डी),नारायण दशरथ गायकवाड (वय ४०, रा. एकनाथवाडी,पाथर्डी),हिरालाल सुखदेव जाधव (वय ४२, रा. मिडसांगवी,पाथर्डी) या आरोपींना बेड्या ठोकल्या.
आरोपींनी नालेगाव,संगमनेर तालुक्यातील पारगाव यात्रा तसेच संगमनेर येथील गगनगिरी महाराज सप्ताहातील गर्दीतून दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.या कारवाईत तोफखाना,संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी पांडुरंग मासाळकर याने पाथर्डीतील एका पडक्या खोलीत लपवून ठेवलेली २ मंगळसूत्रे आणि ३ सोन्याच्या चैनी (एकूण किंमत ५,६७,००० रुपये) जप्त करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.
