मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मध्यप्रदेशातून बेकायदेशीररित्या गावठी कट्टे आणून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. सोनई परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी मुख्य संशयिताला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दुचाकीसह तब्बल २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांचे तीन साथीदार सध्या फरार आहेत.जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते.या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की,सोनई येथील पंकज रामदास कोठवळ याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणले असून,तो खेडले ते सोनई रस्त्यावरील नवनाथनगर परिसरात एका ग्राहकाला कट्टा विक्री करण्यासाठी थांबला आहे.पोलिसांची चाहूल लागताच पळण्याचा प्रयत्न,पण…
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव येथील अंमलदारांनी सापळा रचला.पोलिसांची चाहूल लागताच पंकज कोठवळ याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र,पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा एक गावठी कट्टा
१ हजार रुपये किमतीचे १ जिवंत काडतूस २० हजारांचा मोबाईल १ लाख ५० हजारांची मोटारसायकल (MH-17-DR-5047) असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पंकज कोठवळ याने धक्कादायक खुलासा केला. त्याने व त्याच्या इतर चार साथीदारांनी मिळून थेट मध्यप्रदेशातून ५ गावठी कट्टे आणि १५ जिवंत काडतुसे आणून आपापसात वाटून घेतल्याचे सांगितले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापेमारी करत करजगाव येथून त्याचा साथीदार राजेंद्र सुधाकर जगताप (वय ३०) यालाही ताब्यात घेतले.या गुन्ह्यात विलास आयनर, कैलास बबन आयनर (दोघे रा.अमळनेर, नेवासा) आणि हरीहर उर्फ बंटी औटी (रा.वाटापूर,नेवासा) हे तिघे आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आर्म ॲक्ट कलम ३/२५ आणि ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,अरूण गांगुर्डे, अशोक लिपणे,विशाल तनपुरे, भगवान धुळे,फुरकान शेख, प्रशांत राठोड,शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय शेवगाव पथकाचे दत्तात्रय गव्हाणे,ज्ञानेश्वर शिंदे
यांनी केली आहे.
