कोतवाली ते श्रीरामपूर..एसपींच्या एका इशाऱ्यावर एलसीबीची गुप्त पथके थेट अड्ड्यांवर धडकली;13 ठिकाणी छापे..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अंधाराच्या आड फोफावलेल्या काळ्या धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकाच वेळी मोठी मोहीम उघडली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या गुप्त आदेशानंतर एलसीबीच्या दोन विशेष पथकांनी कोतवाली, श्रीरामपूर शहर आणि तालुका हद्दीत तब्बल 13 ठिकाणी एकाच दिवशी अचानक छापे टाकत अवैध जुगार आणि गावठी दारू अड्ड्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त केले.या अनपेक्षित कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध धंद्यांची माहिती गोळा करून गोपनीय रीतीने दोन स्वतंत्र पथके मैदानात उतरवली होती.
या पथकात पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, पंकज व्यवहारे,सतीष भवर, अतुल लोटके,अभिजीत अरकल,रमीजराजा आतार व आजिनाथ पाखरे यांचा समावेश होता.पक्क्या माहितीच्या आधारे पथकाने 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी कोतवालीसह श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागून एक तब्बल 13 ठिकाणी धाडी घातल्या.पोलिसांचा हा अनपेक्षित दणका पाहून जुगारी आणि हातभट्टी चालकांची पळापळ झाली.या धडक मोहिमेत संबंधित पोलीस ठाण्यांत एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 18,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, गुन्हे शाखेचा हा फास भविष्यात आणखी आवळला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहेत.
