कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
कराड/विजया माने (प्रतिनिधी दि.१३):-नागरिकांचा जीव धोक्यात घालणारा भटक्या कुत्र्यांचा वावर,उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेली आरोग्य यंत्रणा आणि महिलांच्या सन्मानाची उडणारी धूळधान…या गंभीर प्रश्नांवर कराड प्रशासन ढिम्म हलत नसल्याने अखेर ‘आदिशक्ती महासंघाने’ संघर्षाचे हत्यार उपसले आहे.प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात पुकारलेल्या शांततामय उपोषणाचा आज दुसरा दिवस उजाडला असला,तरी अधिकाऱ्यांच्या कानावर जणू जूंही रेंगताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आता प्रशासनाविरोधात अतिशय तीव्र संताप व्यक्त केला आहे.शहर व तालुक्यातील नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या समस्यांवर आदिशक्ती महासंघाने यापूर्वी अनेकदा लेखी निवेदने दिली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओचे पुरावेही सादर केले.मात्र,लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या प्रशासनाला याचा काहीच फरक पडला नाही.अखेर नाईलाजाने आंदोलनकर्त्यांना अन्नत्याग करत उपोषणाला बसावे लागले आहे.
शहरात लहान मुले,महिला आणि वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.श्वान नियंत्रण, निर्बीजीकरण आणि लसीकरण कागदावरच राहिले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. तातडीने मनुष्यबळ भरण्याची जोरदार मागणी केली जात आहे.कोल्हापूर नाका येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही.प्रीतिसंगम घाटावरील ‘हिरकणी कक्ष’ व सार्वजनिक स्वच्छतागृहांची तर अक्षरशःदुरवस्था झाली आहे.आता केवळ पोकळ आश्वासनांवर बोळवण खपवून घेतली जाणार नाही! प्रत्येक मागणीवर प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली आणि ती कधीपर्यंत पूर्ण होणार,याचा निश्चित कालमर्यादेसह लेखी जबाब द्यावा लागेल.अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करेल.उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.प्रशासकीय अधिकारी आता तरी जागे होऊन ठोस निर्णय घेणार की नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणार,याकडे संपूर्ण कराड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
