काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
महाराष्ट्र न्यूज २४ (अहिल्यानगर,दि.१३ ऑगस्ट २०२६):-अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने गुरुवारी दणकेबाज कारवाई केली आहे.दुपारी १२ ते २ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत DSP चौकात विशेष नाकाबंदी करत पोलिसांनी १५२ गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला. विशेष म्हणजे,काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) लावून उघडपणे फिरणाऱ्या ५६ चारचाकी वाहनांच्या फिल्म पोलिसांनी भररस्त्यात जागीच उचकटून काढल्या अन् दंड ठोठावला.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर जिल्हा व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने DSP चौकात आणि शहरातील इतर प्रमुख भागांत अचानक जाळे विणले.
केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पथकाने तुफान कारवाई केली.कायद्याचे उल्लंघन करून कारला काळ्या काचा लावणाऱ्या ५६ चारचाकी गाड्यांना थांबवून त्यांच्या काचांवर लावलेली ब्लॅक फिल्म जागीच हटवण्यात आली.नियम मोडणाऱ्या तब्बल १५२ वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या सूचनेनुसार,शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने फत्ते केली.शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि संशयित किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच अधिक आक्रमकपणे राबवली जाईल,” असा कडक इशारा वाहतूक पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
