अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आदेश
अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):- समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री करू नये, अशी सक्त मनाई करण्यात आली आहे.
यासोबतच प्रशासनाने सर्व पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे.या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापक यांची राहील. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर ‘पेट्रोलियम नियम २००२’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.याशिवाय, सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
