Crime…भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या कृत्यांचा घाणेरडा खेळ उघड..! पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी ‘त्या’ तिघांवर गुन्हा अहिल्यानगर पोलिसांची कडक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केल्याच्या गंभीर आरोपांवरून पोलिसांनी प्रथमच गुन्हा crime दाखल करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे अशा प्रकारचे व्हिडिओ पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.या प्रकरणी अहिल्यानगर पोलिस ठाण्यात कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव तसेच बीड जिल्ह्यातील संदीप गरजे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही संशयित आरोपींच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अश्लील व्हिडिओ एकामागून एक व्यक्तींमध्ये पाठवले गेले होते. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील संदीप गरजे यांनी हे व्हिडिओ योगेश आढाव यांना पाठवले. त्यानंतर योगेश आढाव यांनी ते आपल्या मित्र राहुल शिंदे यांना पाठवले, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी या संपूर्ण व्हायरल साखळीचा माग काढत आरोपींची ओळख पटवली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम २९४ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लैंगिक शोषणातील पीडित महिलांची गोपनीयता भंग करणारे आणि अश्लील सामग्री पसरवणारे कोणतेही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. या घटनेनंतर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या व्हिडिओंचे प्रसारण करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
