हिवरगाव पावसा ग्रामपंचायत ने महावितरण ला दिला जोर का झटका..थकित कराची रक्कम वसुलीसाठी सबस्टेशन कार्यालयास ठोकले टाळे
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- हिवरगाव पावसा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (महावितरण) असलेल्या ७२ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कंपनीच्या ११ के.व्ही.उपकेंद्र कार्यालयास टाळे ठोकले.याबाबत हिवरगाव पावसा ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे असलेल्या सुमारे ७२ हजार रुपयांची कराची थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीस देण्यात आली होती. दोन वेळेस लोक अदालत चे नोटीस बजावण्यात आली होती परंतु, याबाबत विद्युत कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून थेट वसुलीची मोहीम हाती घेत कठोर भूमिका घेतली.अखेर हिवरगाव पावसा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र कासार व ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख यांनी हिवरगाव पावसा उपकेंद्र कार्यालयास टाळे ठोकले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे,काशिनाथ पावसे, गणेश दवंगे,किरण पावसे, बाळासाहेब भालेराव,प्रवीण गडाख यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.वेळेवर लाईट बिल भरण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या वीज मंडळाकडूनच ग्रामपंचायतीचा कर प्रलंबित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या आदेशानुसार सदर मोहीम राबविण्यात आली.हिवरगाव पावसा उपकेंद्रास मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महावितरण कडून ग्रामपंचायत कराची मोठी रक्कम थकित असल्याबद्दल ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याबाबत सरपंच सुभाष गडाख व ग्रामपंचायत अधिकारी हरिष गडाख म्हणाले की,‘‘महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे कराची थकबाकी असून कर भरण्याबाबत विद्युत कंपनीला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्या आदेशानुसार सदर कार्यालयास टाळे लावावे लागले .
महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता शेख यांनी मंगळवार दिनांक ३१ मार्च अखेर ग्रामपंचायत कराचा भरणा करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय चंदनापुरी हिवरगाव पावसा व झोळे या तीन गावची आदर्श ग्राम पाणीपुरवठा योजनेची महावितरणने वीजपुरवठा केल्यामुळे दोन दिवसापासून बंद होता.वीजपुरवठा सुरळीतपणे चालू करून देण्यात आला. सहाय्यक अभियंता शेख व वीज वितरण कंपनीने सहकार्य केल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.हिवरगाव पावसा ग्रामपंचायत नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते नागरिकांचे गैरसोय होऊ नये याकरिता विविध उपाय योजना राबविण्यात येतात.मात्र यासाठी ग्रामपंचायत कराची रक्कम वसूल होणे अत्यंत आवश्यक आहे. महावितरण कार्यालया प्रमाणे टोल प्राधिकरण यांची लाखो रुपयांची मोठ्या प्रमाणात थकित असलेली कराची रक्कम वसूल करण्यासाठी शासकीय पातळीवर तात्काळ उपायोजना न झाल्यास हिवरगाव पावसा टोल प्लाझा सील करण्याचे कारवाई करावी लागेल असे ग्रामपंचायत हिवरगांव पावसा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.