कर्जाच्या विळख्यात मुकादमाचा अंत..! “लेकरांचे हाल होत आहेत” चिठ्ठी लिहून धक्कादायक आत्महत्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरात कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आणि खाजगी सावकारांच्या छळाला कंटाळून एका मुकादमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.बेलापूर रोड कमानी परिसरात राहणारे अर्जुन शरणागत (मुकादम) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,अर्जुन शरणागत हे गवंडी कामाचे मुकादम म्हणून काम करत होते.त्यांच्या हाताखाली अनेक मजूर काम करत असल्याने त्यांना दर आठवड्याला मजुरांचे मानधन देणे आवश्यक होते.यासाठी त्यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते.मात्र,त्यांनी वेळोवेळी व्याज भरूनही सावकारांकडून सतत पैशांची मागणी सुरूच होती.सावकारांकडून वारंवार होणारा तगादा,मानसिक छळ आणि वाढते कर्ज यामुळे शरणागत प्रचंड तणावाखाली होते.अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या.मला माफ करा… कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहेत” अशा हळव्या शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली.
या प्रकरणी मृताच्या पत्नी विद्या शरणागत यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यांच्या तक्रारीवरून खाजगी सावकार सोमनाथ लाड, शंकर लाड आणि किशोर गंगावणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित सावकारांच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, खाजगी सावकारीच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.कर्जबाजारीपण आणि सावकारांचा छळ यामुळे सामान्य कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे हे आणखी एक विदारक उदाहरण समोर आले आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहून कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
