एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आरोग्य म्हणजे केवळ शरीरात आजार नसणे नव्हे, तर शारीरिक,मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणे होय.चांगले आरोग्य हेच आनंदी आणि यशस्वी जीवनाचा खरा पाया आहे,” असे प्रतिपादन डॉ. आकांक्षा हराळे यांनी केले.पिंपळगाव माळवी येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर,संपूर्ण सुरक्षा केंद्र,सुरक्षा क्लिनिक आणि ग्रामपंचायत पिंपळगाव माळवी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे,डॉ.आकांक्षा हराळे,पब्लिक हेल्थच्या कु. मानसी रोडे,संपूर्ण सुरक्षा केंद्र व्यवस्थापक श्री.सागर फुलारी, श्रीमती वैशाली कुलकर्णी,श्री. रोहन भांबळ आणि ‘स्नेहालय’ संचलित स्नेहाधार स्नेहमित्र आधार गटाच्या श्रीमती रोहिणी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.विविध आजारांवर मार्गदर्शन आणि मोफत तपासणी
शिबिरादरम्यान कु.मानसी रोडे यांनी असंसर्गजन्य आजारांविषयी (Non-communicable diseases) उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी उपस्थित महिलांची जनरल तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मोलाचा सल्ला दिला.तसेच स्नेहाधारच्या श्रीमती रोहिणी घोरपडे यांनी रुग्णांशी संवाद साधत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याचे महत्त्व पटवून दिले.एच.आय.व्ही. आणि गुप्तरोगांविषयी जनजागृती
संपूर्ण सुरक्षा केंद्राचे व्यवस्थापक श्री.सागर फुलारी यांनी शिबिरात एच.आय.व्ही. (HIV) आणि एड्स या विषयावर विशेष जनजागृती केली. “प्रत्येकाने आपली एच.आय.व्ही. स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. रक्ताच्या इतर नियमित तपासण्यांसोबतच एच.आय.व्ही. गुप्तरोग, कावीळ यांसारख्या गंभीर आजारांची तपासणी वेळेत करून घेणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.श्री.रोहन भांबळ आणि श्रीमती वैशाली कुलकर्णी यांनी शिबिरात उपस्थित नागरिकांना एच.आय.व्ही. गुप्तरोग व इतर असंसर्गजन्य आजारांविषयी सखोल माहिती देऊन त्यांचे समुपदेशन (Counselling) केले.
या शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात एकूण ५० लोकांची अधिकृत नोंदणी करण्यात आली.सर्व नोंदणीकृत नागरिकांची थायरॉईड,उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), कावीळ,एच.आय.व्ही., गुप्तरोग आणि सिरम कॅल्शियम यांसारख्या विविध महत्त्वाच्या आणि महागड्या रक्ताच्या चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सुरक्षा केंद्र आणि सुरक्षा क्लिनिकच्या सर्व सहकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाबद्दल पिंपळगाव माळवी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आयोजकांचे आभार मानले आहेत.
