संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
संगमनेर (प्रतिनिधी/दत्तात्रय घोलप):-संगमनेर शहरातून एक हृदयद्रावक आणि तितकीच रहस्यमयी घटना समोर आली आहे.संगमनेर बसस्थानक परिसरात अत्यंत गंभीर अवस्थेत सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.राजेंद्र कमलाकर मयुरे असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले असले,तरी त्यांचे नातेवाईक किंवा वारसदार कोण आहेत? ते कोठे राहतात? याचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन पूर्णपणे हतबल झाले असून सध्या पोलिसांसमोर मोठे डोकेदुखीचे कारण बनले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संगमनेर बस स्थानक परिसरात ६५ वर्षीय राजेंद्र कमलाकर मयुरे हे अत्यंत आजारी आणि गंभीर अवस्थेत आढळून आले होते. एका अज्ञात सुजाण नागरिकाने देवदूतासारखे धावून येत त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र,त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर देशमुख यांनी वेळ न गमावता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना २१ जून २०२६ रोजी पहाटे ४:३५ वाजता सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलवण्याचा निर्णय घेतला.अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे पथक राजेंद्र मयुरे यांच्यावर शर्थीचे उपचार करत होते.मात्र,त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत चालली होती.अखेर २२ जून २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्यांची तब्येत कमालीची बिघडली. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.मृत्यू होऊन २४ तास उलटून गेले तरीही मृत राजेंद्र मयुरे यांचे नातेवाईक किंवा कोणताही वारसदार समोर आलेला नाही.संगमनेर शहर पोलिसांकडून सध्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”सदर मृत रुग्णाचे कोणी नातेवाईक,मित्र किंवा ओळखीचे लोक असल्यास त्यांनी तात्काळ संगमनेर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,असे आवाहन महिला पोलीस अंमलदार ज्योती दहातोंडे यांनी केले आहे.जर कोणाला या व्यक्तीबाबत काहीही माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे.
