गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वाढत्या उन्हामुळे रात्रीच्या वेळी गॅलरीचे दार उघडे ठेवून झोपणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे.याचाच फायदा उठवून चोरट्यांनी तब्बल १ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना सर्जेपुरा परिसरात घडली होती.मात्र,तोफखाना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला असून,एका विधीसंघर्षीत बालकासह (नाबालिग) त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने (सोन्याची लगड) जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी सौ. स्वाती विशाल घुगे (वय ३४ वर्षे, धंदा: गृहिणी,रा. घर क्र. १०१९,साईबाबा मंदिराच्या मागे,मिसाळ गल्ली,सर्जेपुरा, ता.जि.अहिल्यानगर) यांनी या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.दि. ३१/०५/२०२६ रोजी रात्री उन्हाळ्याचे दिवस असल्याने घुगे कुटुंब पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेले होते.याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतला आणि घरात प्रवेश केला.पहाटे ६:३० वाजताच्या सुमारास जेव्हा फिर्यादींना जाग आली,तेव्हा बेडरूममधील कपाट आणि इतर संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाची तपासणी केली असता,कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण व कानातील टॉप्स असे एकूण १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना सखोल तपासाचे आदेश दिले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरातील C.C.T.V फुटेजची बारकाईने पाहणी केली.त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा सिद्धार्थनगर येथील एका विधीसंघर्षीत बालकाने केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता,त्याने आपल्या दोन साथीदारांची नावे उघड केली. दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी (वय २२ वर्षे, रा. म्हस्के यांचे इमारतीमध्ये, डाळमंडई, अहिल्यानगर) आणि २) प्रकाश रावसाहेब उमाप (वय २८ वर्षे, रा. सिद्धार्थनगर, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) यांना अटक केली.अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेला १ लाख ९० हजार रुपये किमतीचा १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बिस्कीट (लगड) यशस्वीरित्या जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश साठे करत आहेत. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे (नगर शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, नितीन उगलमुगले,अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सुमित गवळी,अविनाश बर्डे,सतिश त्रिभुवन,सुजय हिवाळे,भागवत बांगर,सतिश शिंदे,शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड,जिजा खुडे आणि कल्पना अवसरे या सर्व तोफखाना पोलीस स्टेशनच्या टीमने केली.तसेच दक्षिण मोबाईल सेलच्या राहुल गुंडू, नितीन शिंदे आणि अरुण सांगळे यांनी तांत्रिक तपासात मोलाची मदत केली. पोलिसांच्या या जलद कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
