नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा येथील एका प्रकरणात दोन निरपराध व्यक्तींची नावे बळजबरीने गुन्ह्यात समाविष्ट केल्याच्या गंभीर आरोपावरून, कर्तव्यदक्षतेसाठी मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेंद्र वाघ यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा येथील एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी कोणत्याही ठोस पुराव्याविना किंवा कायदेशीर कारणाशिवाय दोन व्यक्तींची नावे बळजबरीने गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट केली होती.या मनमानी कारभाराविरोधात आणि चुकीच्या पद्धतीने नाव टाकल्याच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची तीव्र दखल घेण्यात आली.आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निष्पाप नागरिकांना बळजबरीने गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रकार पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारा ठरला.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली.
प्राथमिक चौकशीमध्ये नेवासा येथील दोन जणांचे नाव बळजबरीने टाकल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने,एसपींनी तडकाफडकी आदेश काढत पीएसआय राजेंद्र वाघ यांना निलंबित केले आहे.राजेंद्र वाघ यांना यापूर्वी त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेसाठी देशातील अत्यंत मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.मात्र,अशा वरिष्ठ पदक विजेत्या अधिकाऱ्याकडून नेवासा येथील नागरिकांवर अन्याय झाल्याचे समोर आल्याने आणि थेट निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे.
