अखेर लाखो वारकऱ्यांचे स्वप्न पूर्ण! पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या जिद्दीने पालखी मार्गाचा कायापालट..
संगमनेर (प्रतिनिधी – राजेंद्र मेढे) –
संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या गावांना जोडणाऱ्या आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या काकडवाडी हद्दीतील पालखी रस्त्याची दुरवस्था आता भूतकाळ ठरली आहे. आपल्या धारदार लेखणीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर प्रशासनाशी सातत्याने खंबीर पाठपुरावा करून हा रस्ता पूर्ण करून घेण्यात रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तथा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय घोलप यांना अखेर ऐतिहासिक यश आले आहे. या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम आता पूर्णत्वास गेले असून, या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे.
लाखो वारकऱ्यांची वारी आता सुकर होणार!
दरवर्षी आषाढी वारीच्या पवित्र निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते क्षेत्र पंढरपूर या दिंडी सोहळ्यासाठी या मार्गावरून लाखो भाविक, वारकरी आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तीभावाने मार्गक्रमण करत असतो. खराब रस्त्यामुळे वारकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी ही लोकसमस्या ओळखून विविध वर्तमानपत्रे, वेब पोर्टल्स आणि यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून वेळोवेळी बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे डोळे उघडले.
प्रशासनाचे लाभले विशेष सहकार्य
पत्रकार घोलप यांच्या मागणीची आणि निवेदनांची गांभीर्याने दखल घेत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल गायकवाड यांनी या कामाला प्राधान्य दिले. त्यांच्या विशेष सहकार्यामुळे व तत्परतेमुळे या रस्त्याचे डांबरीकरण अतिशय दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊ शकले.
काकडवाडी ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर राहणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी एक पाऊल पुढे टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणून दत्तात्रय घोलप यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या यशस्वी लढ्यामुळे आणि प्रत्यक्ष रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने काकडवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे. पत्रकार घोलप यांच्या या कौतुकास्पद सामाजिक कार्याचे आणि त्यांच्या चिकाटीचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया: “वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. या वर्षी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि वारकरी बांधव या गुळगुळीत रस्त्यावरून आनंदात पंढरीकडे जातील, याचा आम्हाला मोठा आनंद आहे!”
