पोलिसांची गाडी पाहताच कत्तलखान्यात पळापळ..अंधारात ६ जण गायब ३ जण रंगेहात जाळ्यात..! स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संगमनेर शहरात गुन्हेगारी विश्वाला हादरवून टाकणारी एक मोठी कारवाई पोलीस प्रशासनाने केली आहे. जमजम कॉलनी परिसरातील एका काटवनात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंशीय जनावरांच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने मध्यरात्री छापा टाकला.या थरारक कारवाईत पोलिसांनी तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून,३ आरोपींना रंगेहात अटक केली आहे,तर ६ आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक विशेष पथक संगमनेर भागात गस्तीवर होते.२८ जून २०२६ च्या पहाटे,पोलिसांच्या गुप्त बातमीदाराने अत्यंत गोपनीय माहिती दिली की, जमजम कॉलनीजवळील सरकार लॉन्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आणि काटवनात काही इसम गोवंशीय जनावरांची निर्घृणपणे कत्तल करत असून, ते मांस विक्रीसाठी वाहनात भरत आहेत.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने अंमलदार गणेश लोंढे,विजय पवार, योगेश कर्डीले,बाळासाहेब गुंजाळ,चालक उत्तरेश्वर मोराळे यांनी तात्काळ घटनास्थळाकडे कूच केली.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच तेथे काही लोक जनावरांची कत्तल करताना आणि बाजूलाच एक पिकअप गाडी उभी असलेली दिसली.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपींमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्यांनी अंधाराचा व काटवनाचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून ३ आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.अब्दुलनुर जब्बार कुरेशी (वय २०,रा. भारतनगर,संगमनेर),इमाम हुसैन शेख (वय २८,रा.सायन कोळीवाडा,म्हाडा चाळ,मुंबई),अहमद फारुन शहा (वय ३२,रा.वडाळा ट्रक टर्मिनल रोड,कोकरी आगार, मुंबई), असे पकडलेल्या आरोपींची नावे आहे.अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता,या गुन्ह्यात मुंबई कनेक्शन असल्याचे समोर आले आहे,कारण दोन आरोपी थेट मुंबईतील रहिवासी आहेत. फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
