CRICKET.. IPL च्या नावाखाली शहरात काळा बाजार..! शहरात बुकींचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट..लाखोंचा रोज सट्टा..तरुणाई भरकटली..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासोबत एक वेगळाच ‘काळा खेळ’ रंगताना दिसत आहे.क्रिकेटच्या थरारामागे बुकींचा मोठा सट्टा रॅकेट जोरात सुरु असून,लाखो रुपयांची उलाढाल उघडपणे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा सट्टा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की,शहरात जणू ‘जुगाराचे थैमानच उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे,हा सट्टा पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवला जात आहे.मोबाईल अॅप्स, टेलिग्राम ग्रुप,व्हॉट्सअॅप नेटवर्क आणि गुप्त कोडच्या माध्यमातून ‘लाईव्ह बेटिंग’ सुरू असून, प्रत्येक बॉलवर पैशांचा खेळ सुरू असतो.सामन्याचा निकाल लागण्याआधीच लाखोंची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.या संपूर्ण रॅकेटमध्ये स्थानिक बुकींसोबत बाहेरील राज्यातील सट्टेबाजांचाही हात असल्याचा संशय आहे.काही ठिकाणी तर खास ‘सेटअप’ करून बुकींचे अड्डे चालवले जात असल्याची माहिती मिळत आहे. या अड्ड्यांवरून थेट सट्ट्याचे व्यवहार केले जात असून,मोठ्या रकमेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने फिरवले जात आहेत.
दरम्यान,या सट्टेबाजीच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणावर अडकत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. झटपट पैसे कमावण्याच्या लालसेपोटी अनेक युवक या जाळ्यात ओढले जात असून, अनेकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन केल्याची माहिती आहे.पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असली तरी,बुकींचे जाळे इतके खोलवर रुजले आहे की, कारवाई करणे मोठे आव्हान ठरत आहे.गुप्त पथके तयार करण्यात आली असून, संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे.मोबाईल रेकॉर्ड,बँक व्यवहार आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या आधारे मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.शहरात वाढत चाललेल्या या बेकायदेशीर सट्टेबाजीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील मध्यवर्ती भागात तसेच सावेडी उपनगर ते मार्केटयार्ड पर्यंत बुकिंगचे मोठे जाळे पसरलेले आहे.आता पोलिस या ‘काळ्या साम्राज्यावर’ कधी आणि कसा घाव घालतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…
