धक्कादायक:घराच्या बांधकामाची रेकी करून वायर चोरणारी टोळी जेरबंद.. एम.आय.डी.सी.पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी नजर ठेवून,घरातील महागडे इलेक्ट्रिक केबल्स लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीला जेरबंद करण्यात एम.आय.डी.सी.पोलिसांना मोठे यश आले आहे.पोलिसांनी या कारवाईत २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, गुन्ह्याचा छडा अवघ्या काही दिवसांत लावला आहे.नागापूर परिसरातील कातोरे वस्ती येथे राहणारे फिर्यादी राहुल लक्ष्मण कातोरे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. ७ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून अंडरग्राउंड लाईट फिटिंगसाठी आणलेले ‘पॉलीकॅब’ आणि ‘आर.आर. कंपनी’चे २.६० लाख रुपये किमतीचे केबल्स चोरून नेले होते.याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी श्री. माणिक बी.चौधरी यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.या तपासाअंती पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले:
१) निखिल दिलीप पवार (वय २० वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी)
२) दादासाहेब अजय पवार (वय १८ वर्षे, रा. भोसले आखाडा, अहिल्यानगर)
३) एक विधीसंघर्षित बालक.
तसेच या गुन्ह्यातील त्यांचा साथीदार करण पवार हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरलेले विविध कंपन्यांचे महागडे केबल्स,केबल कापण्यासाठी वापरलेली हत्यारे, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी,पोलीस अंमलदार राकेश खेडकर,राजू सुद्रिक,सचिन आडबल,शैलेश रोहोकले, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आधाव, किशोर जाधव, सुरज देशमुख, दक्षिण मोबाईल सेल्फी नाय नाय राहुल गुंडु आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
