Police caught in the web of bribery..तोफखाना पोलीस ठाण्यातील अंमलदार लाचलुचपतच्या जाळ्यात..३५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पोलीस ठाण्यातील चकरा थांबवण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अनिल गोसावी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, ‘पोलीस दादांच्या’ वाढत्या ‘खादाडी’ची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
नेमके प्रकरण काय?
तोफखाना पोलीस ठाण्यात पती-पत्नीमधील घरगुती भांडणावरून ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम’ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, फिर्यादी आणि संबंधित व्यक्तींना वारंवार पोलीस ठाण्यात यावे लागत होते.तपासात सहकार्य करण्यासाठी आणि पोलीस स्टेशनला वारंवार मारावे लागणारे फेरे वाचवण्यासाठी पोलीस अंमलदार अनिल गोसावी याने संबंधित व्यक्तीकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेच्या मागणीबाबत तक्रार प्राप्त होताच अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तोफखाना परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अनिल गोसावी याला पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे काम सुरू होते.
कारवाई करणारे पथक:
ही धडक कारवाई अहिल्यानगर लाचलुचपत विभागाचे:
अजित त्रिपुटे (पोलीस उपअधीक्षक),संतोष चंद्रकांत शिंदे (पोलीस अंमलदार),रवींद्र केशव शिंदे (पोलीस अंमलदार),बाबासाहेब एकनाथ कराड (पोलीस अंमलदार),हारुण खाजालाल शेख (चालक पोलीस अंमलदार) यांच्या पथकाने केली आहे.
महत्त्वाची टीप: कोणत्याही शासकीय लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
