धक्कादायक! पत्याचा क्लब चालवण्यासाठी हप्ता मागणाऱ्या पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले..५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीची मोठी कारवाई
अहिल्यानगर (कर्जत प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनमधील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करण्यासाठी आणि तो सुरळीत चालू देण्यासाठी या हवालदाराने दरमहा हप्त्याची मागणी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार,या प्रकरणातील तक्रारदाराचा मिरजगाव येथे ‘पत्ते क्लब’ आहे.हा क्लब विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी आणि त्यावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ नये,यासाठी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक सर्जेराव पवार (वय ३९ वर्षे,बक्कल नंबर १६२५) यांनी तक्रारदाराकडे दरमहा ५ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. “जर हप्ता दिला नाही, तर क्लब बंद पाडू,” अशी धमकीही त्यांनी दिली होती.सततच्या या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने नाशिक/अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.एसीबीने तक्रारीची शहानिशा केली आणि गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचला.मिरजगाव येथील क्रांती चौकातील ‘नटराज ज्यूस सेंटर’ येथे हवालदार दीपक पवार याने तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते.तो तिथे ज्यूस पिण्यासाठी थांबला असताना,पंचांसमक्ष त्याने ५ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली.रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला जागीच झडप घालून ताब्यात घेतले.या प्रकरणी दीपक पवार याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक श्री.माधव रेड्डी आणि श्री.सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या यशस्वी सापळ्याचे नियोजन पोलीस उपअधीक्षक श्री.अजित त्रिपुटे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार संतोष शिंदे,रवींद्र निमसे,बाळासाहेब कराड आणि चालक हारून शेख यांनी केले.
एसीबीचे आवाहन:
जर कोणी शासकीय लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० वर संपर्क साधावा,असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
