कोतवालीच्या खांद्यावर मानाचा तुरा..! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद बाबासाहेब गोल्हार यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या, अत्यंत धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी-अंमलदारांचा दरवर्षी ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DGP Medal) देऊन गौरव केला जातो. २०२६ सालासाठीची ही मानाची पदकं नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद बाबासाहेब गोल्हार यांनी बाजी मारली आहे.राज्यातील पोलीस दलात ‘डीजीपी मेडल’ हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. उत्कृष्ट तपास, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि प्रदीर्घ काळ निष्कलंक सेवा देणाऱ्या पोलिसांनाच या पदकाने सन्मानित केले जाते. गोविंद गोल्हार यांनी आपल्या सेवाकाळात अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर केले आहे.
गोविंद गोल्हार यांना हे पदक जाहीर होताच कोतवाली पोलीस ठाण्यासह संपूर्ण जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि विविध स्तरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“हे पदक म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा आणि सहकाऱ्यांच्या साथीचा हा विजय आहे,” अशी भावना गोल्हार यांनी व्यक्त केली आहे.अहिल्यानगरच्या या सुपुत्राने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
