मोठी बातमी:अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली..! आता अहिल्यानगरची सूत्रे स्वीकारणार हे नूतन पोलीस अधीक्षक
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आस्थापना मंडळ क्र.१ च्या शिफारशीनुसार राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले आहेत. या आदेशानुसार, सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती आता सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. तर, मुमक्का सुदर्शन यांच्याकडे आता अहिल्यानगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) मधील कलम २२ न मधील तरतुदींचा वापर करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आस्थापना मंडळाने केलेल्या शिफारशींचा सखोल विचार करून राज्य शासनाने या पदस्थापना निश्चित केल्या आहेत.या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तातडीने कार्यमुक्त होऊन नवीन पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
