समृद्धी महामार्गावर थरार..! ५५ लाखांचे अवैध डिझेल स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..गडचिरोलीच्या खाणीत जाणारा तस्करीचा ‘गेम’ उधळला!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-समृद्धी महामार्गावरून गडचिरोली येथील खाणीमध्ये विक्रीसाठी नेण्यात येणारा ३४,००० लिटर अवैध डिझेलचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून पकडला आहे.या कारवाईत पोलिसांनी ५५,८७,८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे,तर इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.दि.३० एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की,एक टँकर (क्रमांक MH 43 BP 5085) विविध पेट्रोल पंपांवरून अवैधरित्या डिझेल भरून ते सुरजागड (जि. गडचिरोली) येथील खाणींमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणार आहे.
मिळालेल्या माहितीची खात्री पटताच, पोलिसांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावरील पोल नंबर ५२० जवळ सापळा रचला.संशयित टँकर येताच पोलिसांनी तो अडवला आणि तपासणी केली.डिझेल: ३४,००० लिटर (किंमत ३०,८७,८४० रुपये),टँकर: एम.एच. ४३ बी.पी. ५०८५ (किंमत २५,००,००० रुपये),एकूण किंमत: ५५,८७,८४० रुपये पोलिसांनी टँकर चालक महादेव वचिष्ट डांगे (वय ५०, रा.नवी मुंबई) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता,त्याने हा माल प्रमोद हरणे,प्रतीक सानप आणि एका मोबाईलधारकाच्या सांगण्यावरून शहापूर खर्डी रोड आणि स्टेट हायवे ४४ वरील विविध हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवरून भरल्याचे कबूल केले. कोणत्याही प्रकारचा शासकीय परवाना किंवा करारनामा नसताना,अत्यंत धोकादायक पद्धतीने या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक केली जात होती.गुन्हा दाखल व कारवाई या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २२३, २८७ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक दीपक मेढे,विजय पवार,राहुल द्वारके,प्रकाश मांडगे,सुनील मालणकर,प्रशांत राठोड,अरुण मोरे यांनी केली आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.
