इन्शुरन्सची रक्कम लाटण्यासाठी स्वतःच्याच गाडीची चोरी..! मात्र LCB ने असा केला भांडाफोड..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम लाटण्याचा एक धक्कादायक कट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने उघडकीस आणला आहे.याप्रकरणी पोलिसांनी मूळ फिर्यादीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून,त्यांच्याकडून स्कॉर्पिओ आणि गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती टेम्पो असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मुकुंदनगर (अहिल्यानगर) येथील रहिवासी अर्शद अयुब शेख याने त्याची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती.या तक्रारीवरून पोलिसांत ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलम ३०५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र,पोलिसांच्या सखोल तपासात हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे समोर आले.अहिल्यानगर शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.हे पथक तपास करत असताना, दिनांक ४ जून २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, श्रीरामपूर येथील मैनुद्दीन शकील पठाण आणि त्याच्या साथीदारांनी ही गाडी चोरली आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून मैनुद्दीन पठाण (वय २१, रा. टिळक नगर, श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला.आरोपी मैनुद्दीनने कबुली दिली की,मूळ फिर्यादी अर्शद अयुब शेख याच्या सांगण्यावरूनच त्याने आणि सलमान मेहबूब खान (वय २१, रा. कोठला, अहिल्यानगर) याने इन्शुरन्स क्लेम लाटण्याच्या उद्देशाने ही स्कॉर्पिओ गाडी गायब केली होती.पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला ₹५,००,००० किमतीचा छोटा हत्ती टेम्पो आणि ₹५,००,००० किमतीची स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी या गुन्ह्यातील मूळ फिर्यादी अर्शद शेख याच्यासह त्याचे साथीदार मैनुद्दीन पठाण आणि सलमान खान या तिघांना अटक केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आणि मुद्देमालाला तोफखाना पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोउपनि अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार शाहिद शेख,सुनील पवार,फुरकान शेख,अरविंद भिंगारदिवे,योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.
