भिंगार कॅम्प पोलिसांची अंगावर काटा आणणारी कारवाई..!स्नेहालयातील बालभवन मध्ये चोरी करून पळणाऱ्या चोराला कसं आणि कुठे गाठलं? वाचा पूर्ण थरार…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार येथील ‘स्नेहालय संचलित बालभवन’ या बंद शाळेचे कुलूप तोडून आतून महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा उघडकीस आणला आहे.
दि. ४ जून ते ५ जून २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मोमीन गल्ली,भिंगार येथील स्नेहालय संचलित बालभवन या बंद शाळेचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता.चोरट्याने शाळेतील तोशिबा कंपनीचा ४२ इंची टीव्ही,इंन्टेक्स कंपनीचा स्पीकर आणि गोल्डन रंगाचा माईक असे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी अंजुम सगीर शेख (वय ४२) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नंबर ३०५/२०२६, बीएनएस कलम ३३१(३)३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी साहिल राजू काकडे (वय २३ वर्षे,रा. सदरबाजार,भिंगार, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली,परंतु पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता,त्याने चोरीची कबुली दिली आणि चोरलेला सर्व माल पोलिसांच्या स्वाधीन केला.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.जगदीश मुलगीर सहा.पोलीस निरीक्षक,भिंगार कॅम्प पो.स्टे.,श्री.गजेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक,श्री.योगेश पवार पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे,दिपक शिंदे,रविंद्र टकले,प्रमोद लहारे,कैलास शिरसाठ,पांडुरंग खेडकर, राजू अकोलकर यांनी केली आहे.
