धक्कादायक..शहरातील नामांकित शोरूमला ४१ लाखांचा गंडा ! ५ नव्या कोऱ्या स्विफ्ट डिझायर गाड्या पळवणारे भामटे अखेर कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बनावट बँक मेसेज आणि युटीआर (UTR) नंबर दाखवून नामांकित कार शोरूमची तब्बल ४१,००,००० (४१ लाख) रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपींनी शोरूमची दिशाभूल करून मिळवलेल्या पाचही नव्या कोऱ्या स्विफ्ट डिझायर (T परमिट) कार पोलिसांनी जप्त केल्या असून या धडक कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.सावेडी येथील निर्मलनगरचे रहिवासी असलेले आरोपी पवन गुरुनाथ पांडव (वय ३८) आणि संतोष त्रिंबक दळवी (वय ४४) यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी शिल्पा गार्डन समोरील ‘महालक्ष्मी ऑटोमोटीव्ह मारुती सुझुकी शोरूम’मधून ५ गाड्यांची खरेदी केली होती.आरोपींनी शोरूम व्यवस्थापनाला बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे बनावट मेसेज आणि खोटे UTR नंबर पाठवले.शोरूमच्या अकाउंट विभागाने पडताळणी केली असता खात्यात पैसेच आले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर जेव्हा शोरूमने तगादा लावला,तेव्हा आरोपींनी दिलेले चेकही खात्यात शिल्लक नसल्याने फेटाळले (बाउन्स) गेले.शोरूमला दाद न देता आरोपींनी या ५ गाड्यांपैकी काही गाड्यांची पुणे व सावेडी परिसरातील लोकांना परस्पर विक्री देखील करून टाकली होती.
अखेर १ जून २०२६ रोजी शोरूम व्यवस्थापनाने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी स.पो.नि.तेजश्री विठ्ठल थोरात यांनी चक्रे फिरवून आरोपींना २ जून रोजी अटक केली.पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आपले कसब वापरून आरोपींकडून आणि त्यांनी ज्यांना गाड्या विकल्या होत्या त्यांच्याकडून MH.16.DP.3496,3497, 3498, 3501 आणि 3520 या पाचही स्विफ्ट डिझायर कार पंचांसमक्ष जप्त केल्या आहेत.”सध्या अशा प्रकारे डिजिटल पेमेंट आणि चेकद्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही वाहनाची डिलिव्हरी देण्यापूर्वी बँक खात्यात रक्कम पूर्णपणे जमा (Clear) झाल्याची खात्री करूनच गाडी ग्राहकाच्या स्वाधीन करावी असे आवाहन कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांनी केले.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि.संभाजी गायकवाड,सपोनि.तेजश्री थोरात,स.फौ.अशोक सरोदे, सुनिल भिंगारदिवे,बाळकृष्ण दौंड,विशाल दळवी,विनोद बोरगे, विजय काळे,संदीप पितळे, दिपक रोहकले,सत्यजित शिंदे, सुरज कदम,शिरीष तरटे,अतुल कोतकर,रमेश शिंदे,अमोल गाडे, अतुल काजळे,अतुल लाटे, सचिन लोळगे,संकेत धीवर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी रोहकले यांनी केली आहे.
