३० लाखांच्या सोयाबीनसह पळवलेला ट्रक पकडला.. चालकाचा शोध वेगाने सुरु ! स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
श्रीरामपूर येथून तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त किमतीचे महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे आणि ट्रक घेऊन पसार झालेल्या चालकाचा डाव अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उधळून लावला आहे. पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे छापा टाकून ३०,३९,६४८/- रुपयांच्या मुद्देमालासह आयशर ट्रक हस्तगत केला असून, या कारवाईमुळे वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राहुरी येथील व्यावसायिक प्रदीप शिवनारायण भट्टड यांचे भाऊ सुनील भट्टड यांच्या मालकीचा आयशर ट्रक (क्रमांक: MH-12 VF-6911) हा २९ मे २०२६ रोजी श्रीरामपूर येथील दत्तनगर गजानन रोडवेज ट्रान्सपोर्टवरून महाबीजचे सोयाबीन बियाणे भरून निघाला होता.गाडीवर चालक जयसिंग मुक्ताजी भगत (रा. खानापूर, जुन्नर, जि. पुणे) याला विश्वासाने पाठवले होते. मात्र, चालकाने मालाची योग्य ठिकाणी डिलिव्हरी न देता, माल हडप करण्याच्या उद्देशाने ट्रक भलतीकडेच पळवून नेला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.
पथक शोध घेत असतानाच,पोउपनि संदीप मुरकुटे व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, अपहार केलेला तोच सोयाबीनचा ट्रक खेड (जि. पुणे) तालुक्यातील राजगुरुनगर मार्केटयार्डमध्ये उभा आहे.माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता राजगुरुनगर गाठले आणि मार्केटयार्डमध्ये उभा असलेला संशयास्पद ट्रक ताब्यात घेतला.व पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला.ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली,एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड,भगवान थोरात, रमीजराजा आतार आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने केली आहे.
