अहिल्यानगरमध्ये ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी..४ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कठोर नियम लागू..शस्त्रे,सभा आणि आंदोलनांवर पूर्ण बंदी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आगामी सण-उत्सव,अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे (VIP) दौरे आणि जिल्ह्यात निर्माण झालेले जातीय संवेदनशील वातावरण लक्षात घेता अहिल्यानगर प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा महसूल हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश (जमावबंदी) लागू करण्यात आले आहेत.प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष दळवी यांनी हे आदेश जारी केले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) आणि ३७ (३) नुसार लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.काठ्या, सोटे,तलवारी,भाले,सुरे,बंदुका किंवा शरीराला इजा पोहोचवेल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास बंदी असेल.दगड,क्षेपणास्त्रे (किंवा दगड फेकण्याची साधने) जमा करणे,दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे अथवा तयार करण्यावर पूर्णपणे रोख लावली आहे.कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या,चित्रे,चिन्हे किंवा प्रतिमांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यास मनाई आहे.
प्रशासनाने सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर कडक पावले उचलली आहेत.५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास,सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी सभा घेण्यास,मिरवणुका काढण्यास आणि रस्ता रोको करण्यास मनाई करण्यात आली आहे.चिथावणीखोर भाषणे देणे, सभ्यता अथवा नीतिमत्तेला धक्का पोहोचवणारे हावभाव करणे,सोंग आणणे यावर बंदी आहे.जाहीरपणे घोषणा देणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा विनापरवानगी वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.सर्वसामान्यांची अडचण होऊ नये म्हणून प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण बाबींना या आदेशातून वगळले आहे:
सूट देण्यात आलेल्या गोष्टी:
१. धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम: लग्नसमारंभ, लग्नाच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका आणि अंत्ययात्रा यांना या बंदीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
२. शासकीय सेवा व वृद्ध: ऑन-ड्यूटी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शारीरिक दुर्बलतेमुळे लाठी/काठी वापरणाऱ्या ज्येष्ठांना हा नियम लागू नसेल.
३. परवानगी घेतलेले कार्यक्रम: संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी (PI/API) यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा आणि मिरवणुकांना सूट असेल.प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
