बोल्हेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात रविवारी २५ हजार भाविकांचे सामूहिक चरित्र पारायण..!अहिल्यानगरमध्ये अध्यात्माचा जागर;चंद्रशेखर काका लोळगे यांचे भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील ‘श्री स्वामी समर्थ केंद्र’ (दिंडोरी प्रणित) येथे येत्या रविवारी (दि.26 जुलै) सकाळी 8 ते 11 या वेळेत 25 हजार भाविकांचा भव्य सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रप्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या पुढाकारातून हा अभिनव व भक्तिमय उपक्रम साकारणार आहे.सुमारे 25 वर्षांपूर्वी अत्यंत साध्या स्वरूपात सुरु झालेल्या या केंद्राने आज अलोट जनसागर आकर्षित केला आहे. व्यसनाधीनता आणि नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या अनेक तरुणांना स्वामींच्या विचारांनी नवजीवन दिले आहे.
“कमी भांडवलात व्यसनांपासून दूर राहून अध्यात्माची कास धरल्याने शेकडो तरुणांनी उद्योग, व्यवसाय आणि नोकरीत उत्तुंग यश मिळवले आहे.केंद्रातील बालसंस्कार विभागासह सर्व १८ विभागांच्या माध्यमातून सुजाण आणि संस्कारक्षम समाज घडवण्याचे कार्य अविरत सुरू आहे.आजघडीला बोल्हेगाव केंद्रात केवळ अहिल्यानगरच नव्हे,तर इतर जिल्ह्यांतूनही हजारो भाविक दर्शनासाठी व सेवेसाठी येतात. विशेषतःगुरुवार आणि रविवारी येथे भक्तांची मोठी गर्दी असते.या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी पार पडणाऱ्या या २५ हजार भाविकांच्या महा-पारायण सोहळ्यात सर्व आबालवृद्ध,तरुण आणि महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी सेवेचा व स्वामी कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख चंद्रशेखर काका लोळगे व सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
