सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कराड मधून जोरदार पाठिंबा! शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर आदिशक्ती महासंघ’ व सामाजिक कार्यकर्त्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण!
कराड (प्रतिनिधी):-संविधानिक हक्क आणि लोकहिताच्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक श्री.सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कराडमधील सामाजिक वातावरण तापले आहे.या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार,दि. २४ जुलै २०२६ रोजी कराड तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले आहे.’आदिशक्ती महासंघ’ आणि कराड तालुक्यातील सर्वपक्षीय व संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपोषणाचे आयोजन केले आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी वेताळ पाटील,सविता काशिद व इतर आयोजकांनी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना अधिकृत निवेदन सादर करून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संदर्भात आवश्यक परवानगी व सहकार्याची मागणी केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उपोषणात सहभागी होणारे कार्यकर्ते, महिला,ज्येष्ठ नागरिक व नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून कार्यक्रमस्थळी तात्पुरता मंडप,लहान व्यासपीठ (स्टेज) व खुर्च्यांची सोय करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
ही व्यवस्था करताना सार्वजनिक रस्ता,वाहतूक व्यवस्था अथवा सरकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही,याची पूर्ण दक्षता घेतली जाईल,असे आश्वासन आयोजकांनी प्रशासनाला दिले आहे.”सदर आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण,संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने पार पाडले जाईल.आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करू,” असा विश्वास आयोजकांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे.दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये होणाऱ्या या उपोषणामुळे पश्चिमेकडील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून,या उपोषणाला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
