नगरसेवक मयुर बांगरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर महावितरण प्रशासनाची उडाली तारांबळ ..रात्री तब्बल ११:३० वाजता कार्यालयात ठिय्या..अवघ्या १० मिनिटांत वीज पूर्ववत! नागरिकांना मोठा दिलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर शहरातील प्रभाग १७ मधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून सततच्या वीज खंडित होण्याच्या समस्येने पुरते त्रस्त झाले आहेत.उकाडा आणि त्यातच वारंवार जाणारी वीज यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला होता.याच गंभीर समस्येची दखल घेत ‘ऑन फील्ड’ नगरसेवक मयुर बांगरे यांनी रात्री तब्बल ११:३० वाजता थेट महावितरण (MSEB) च्या उपविभागीय कार्यालयात धडक दिली.त्यांच्या या अचानक आणि आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
“जोपर्यंत वीज येत नाही, तोपर्यंत हलणार नाही!”.. नगरसेवक मयूर बांगरे
रात्रीच्या वेळी वीज गायब झाल्याने नागरिक हवालदिल झाले असताना,नगरसेवक मयुर बांगरे यांनी थेट शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. “जोपर्यंत प्रभाग १७ मधील वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून एक पाऊलही मागे हटणार नाही!” अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत बांगरे यांनी थेट कार्यालयातच ठिय्या मांडण्याचा इशारा दिला.
महावितरणच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप
नागरिक अंधारात आणि त्रासात असताना संबंधित जबाबदार अधिकारी कार्यालयातून गायब
असल्याचे दिसून आले.यावरून महावितरणच्या भोंगळ आणि अत्यंत निष्काळजी कारभारावर नगरसेवक मयुर बांगरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.”जनतेला वेठीस धरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,जनतेच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सुनावले.नगरसेवक मयुर बांगरे यांचा रौद्र अवतार आणि वाढता जनक्षोभ पाहून प्रशासनाला तातडीने दखल घेणे भाग पडले.जे काम तासनतास रखडले होते,ते काम बांगरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अवघ्या १० मिनिटांत मार्गी लागले आणि प्रभागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.“जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी मी २४ तास ऑन फील्ड उपलब्ध आहे.महावितरणच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल,तर मी शांत बसणार नाही.हा तर फक्त ट्रेलर होता,यापुढे जनतेला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे.असा कडक इशारा बांगरे यांनी दिला.या धडक कारवाईमुळे प्रभाग १७ मधील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, “जनतेसाठी लढणारा नगरसेवक कसा असावा,हे बालीभाऊंनी दाखवून दिले,” अशा भावना प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
