धक्कादायक..शासकीय रुग्णालयातून एमएलसी रेकॉर्डची फोडली खिडकी..२४ ‘एक्स-रे’ गठ्ठे गायब पोलिसांनाही पडलं कोडं,काय आहे या चोरीमागचं रहस्य?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अत्यंत संवेदनशील आणि न्यायालयीन तसेच पोलीस तपासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘एमएलसी’ (मेडिको-लीगल केस) रेकॉर्ड रूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनासह पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून,नेमके कोणत्या उद्देशाने ही चोरी करण्यात आली, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक कैलास काशिनाथ शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल आणि सिटी स्कॅन विभागाजवळ असलेल्या खोली क्रमांक २८ मध्ये मागील १५ वर्षांतील न्यायालयीन आणि पोलीस प्रकरणांशी संबंधित महत्त्वाची एमएलसी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. ही रेकॉर्ड रूम अत्यंत महत्त्वाची मानली जाते.५ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे रेकॉर्ड रूम कुलूप लावून बंद करण्यात आली होती.मात्र,९ जून रोजी सकाळी कैलास शिंदे हे काही जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी तेथे गेले असता, रूमच्या दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना संशय आला.
त्यानंतर त्यांनी रूमच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली असता,खिडकी उघडी असल्याचे आणि तिचे लोखंडी ग्रील काढून नेल्याचे दिसून आले. खिडकीतून आत प्रवेश करून पाहिले असता, संपूर्ण रेकॉर्ड रूममधील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. अज्ञात चोरट्याने खोलीतील कागदपत्रांची उलथापालथ करून वर्ष २०२१ ते २०२२ या कालावधीतील एमएलसी ओपीडी एक्स-रे विभागाचे बांधून ठेवलेले तब्बल २४ गठ्ठे तसेच खिडकीचे लोखंडी ग्रील चोरून नेल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, चोरीला गेलेले रेकॉर्ड हे न्यायालयीन व पोलीस तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकणारे दस्तऐवज असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. केवळ लोखंडी ग्रील चोरण्यासाठी इतक्या संवेदनशील रूममध्ये प्रवेश करण्यात आला की विशिष्ट कागदपत्रांवरच डोळा होता, याचा तपास पोलीस करत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील महत्त्वाच्या रेकॉर्डच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
