भारतीय रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त..तब्बल ११ लाखांच्या मुद्देमालासह ४ जण पोलिसांकडून गजाआड रेल्वेचा मोठा घातपात टळला..
अहिल्यानगर प्रतिनिधी:-भारतीय रेल्वेला कोट्यवधींचा चुना लावत थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका अत्यंत धोकादायक आणि संघटित टोळीचा रेल्वे पोलिसांनी (RPF) ने पर्दाफाश केला आहे.दौंड हायवेवरील खडकी–चिखली गावांच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून तब्बल ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली आहे.या खळबळजनक कारवाईत पोलिसांनी ४ अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या असून,यामुळे भारतीय रेल्वेचे होणारे मोठे आर्थिक नुकसान आणि रेल्वे वाहतूक सुरक्षेवरील एक मोठा संभाव्य धोका टळल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या महत्त्वाच्या सिग्नलिंग साहित्याची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या चोऱ्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन मोठा अपघात घडवण्याचा कट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती.याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या गुप्तहेर विभागाला दौंड हायवेवरील खडकी-चिखली गावच्या परिसरात काही संशयास्पद हालचालींची खात्रीशीर माहिती मिळाली.माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने रात्रीच्या अंधारात संपूर्ण परिसराला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,मात्र सतर्क पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.आरोपींची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडून रेल्वे सिग्नलिंगसाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ११,०८,९१२ रुपये आहे.
हे साहित्य आरोपींनी कुठून चोरले आणि ते कोणाला विकणार होते,याचा तपास आता पोलीस करत आहेत.रेल्वेची सिग्नल यंत्रणा हा रेल्वे वाहतुकीचा मुख्य कणा आहे. जर सिग्नल यंत्रणेचे साहित्य चोरीला गेले,तर धावत्या गाड्यांना चुकीचे सिग्नल मिळून भीषण अपघात होऊ शकतो.या टोळीला अटक केल्यामुळे आम्ही केवळ रेल्वेचे आर्थिक नुकसानच वाचवले नाही,तर हजारो प्रवाशांचे प्राण आणि रेल्वे वाहतुकीवरील मोठा संभाव्य धोका टळला आहे.अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते एका संघटित टोळीचे सदस्य आहेत.या टोळीचे जाळे किती मोठे आहे? रेल्वे विभागातीलच कोणाचा यामध्ये हात आहे का? आणि चोरीचा हा माल कोणत्या मोठ्या भंगार व्यापाऱ्यांना विकला जात होता? या सर्व अँगलने रेल्वे पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे रेल्वे चोरांचे धाबे दणाणले आहेत.
